The Light of Life Fellowship
Church • Pune, MH • 1 member
News
Sort by
newest
About this group
Church
group
1
members
“मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
Follow
तुम्ही येशूचे शिष्य आहात का? मत्तय २८:१८-२० “तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे. 19म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 20आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.” येशू ख्रिस्ताने सोपविलेल्या एका महान कामगिरीची सूचना/आज्ञा या वचनातून पहायला मिळते. अ. जा आणि सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. आ. संपूर्ण जगाला ख्रिस्ताचे बनविण्यासाठी त्यांना शिष्य बनविण्याचे उद्दिष्ट सुवार्तेच्या कार्यामधील महत्वाचे उद्दिष्ट आहे. २. तुम्ही येशूचे शिष्य आहात का? - तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता. - किंवा तुम्ही दर रवीवारच्या उपासनेला नियमितपणे उपस्थित असणारे असाल ही, परंतु शिष्य होणे म्हणजे एवढेच आहे का? येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य म्हणजे नेमकं काय हाच आजच्या संदेशाचा विषय आणि उद्देश आहे. या संदेशातून तुम्हाला शिष्य असणे किंवा होणे म्हणजे काय ते अधिक स्पष्टपणे समजेल. १. शिष्यत्वाची व्याख्या अ. ‘शिष्य’ हा शब्द महत्त्वाचा इ. ह्याचा शब्दश: अर्थ आहे शिकणारा. ई. ह्याचा दुसरा अर्थ असा की, दुस-या व्यक्तिच्या शिक्षणाला अनुसरणारा उ. शिष्य म्हणजे केवळ शिकणारा नव्हे तर त्याचे अनुकरण करणारा किंवा अनुयायी ऊ. वरील विचारानुसार शिष्य हा त्याच्या गुरूची नक्कल करणारा असा. ब. शिष्याचे उद्दिष्ट - येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे शिष्य हा त्याच्या गुरूसारखा असावा. लुक ६:४० “कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही. पण प्रत्येक शिष्य जेव्हा पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच होतो.” - येशूचे शिष्य ह्या नात्याने येशूसारखे असण्यासाठी झटणे. - मानवाच्या मुक्तिची जी देवाची योजना होती त्याला पूरक अशी योजना. रोम ८:२९ “कारण त्यास ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.” तुम्ही येशूला अनुसरून त्याच्यासारखे झाला आहात का? जोपर्यंत असे होत नाही तो पर्यंत तुम्ही स्वत:ला त्याचे शिष्य म्हणवू नका. खरे शिष्य कोण हे ओळखण्यासाठी येशू ख्रिस्ताने आम्हाला काही खुणा किंवा परिमाण दिले आहे. २. शिष्यत्वाच्या खुणा- अ. ख्रिस्ताच्या वचनाशी जडून राहणे. ऋ. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना तो काय म्हणतो याकडे लक्ष द्या. योहान ८:३१ “ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.” ऌ. ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे मेहनती विद्यार्थी असे ह्या वचनातून सूचित केले आहे. ऍ. ‘शिष्य होणे’ या मधे तो वचनानुसार कृती करणारा असणे गरजेचे आहे. मत्तय ७:२१-२७, याकोब १:२१-२५ ब. बंधूंवर प्रीति करणे. - येशूने त्याला अनुसरणा-यांना काय सांगीतले ते लक्षात घ्या. योहान १३: ३४,३५ “मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. 35तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.” - येशू ख्रिस्ताने केलेल्या प्रीतीतून प्रीती करण्याचा आराखडा तयार झाला. (जशी मी तुम्हावर प्रीती केली.) - असे प्रेम जे इतरांना दिसेल. (यावरून सर्वांना समजेल) क. विपुल फळ द्या. - येशूने त्याच्या शिष्यांना काय सांगीतले ते वाचा. योहान १५:८ “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.” - ‘विपुल’ ह्या शब्दाकडे लक्ष द्या. (हा शब्द वचन ५ मधेही दिसतो.) ह्या ठिकाणी प्रभू येशू कधी तरी करण्याच्या चांगल्या गोष्टीविषयी बोलत नाही. परंतु अशा जीवनशैलीविषयी सांगतो की, जी इतरांसमोर देवाचे गौरव प्रगट करील. मत्तय ५:१६ “तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.” १ पेत्र २:१२ “परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.” विपुल फळ देण्यातील अपयशाचा परिणाम ख्रिस्ताकडून मिळणा-या तारणावर दिसेल. योहान १५:१,२ “मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. 2माझ्यातील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणार्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्यास साफसूफ करतो.” येशूचे ख्रिस्ताचे शिष्य असणे हे एखद्या मंडळीचे साधारण सभासद असण्यापेक्षा अधिक जास्त आहे. शिष्य होण्याकरिता वचनबद्धता (कमिटमेंट) असणे गरजेचे आहे. विशेष करुन ख्रिस्ताच्या शिकवणुकीच्या संदर्भात. आपण जेव्हा वरील गोष्टी मान्य करतो तेव्हा वचनबद्धता दिसते. ३. शिष्यत्वाची किंमत. अ. तुमच्या जीवनात ख्रिस्त सर्वात प्रथम असला पाहिजे. ऎ. हे ख्रिस्ताने प्रखरपणे स्पष्ट केले आहे. लुक १४:२५,२६ “त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते; तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.” ए. आमच्या कुटुंबातील व्यक्तिच्या किंवा इतर कोणाच्याही आधी ख्रिस्त. मत्तय १०:३४-३७ “मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका. ३५ मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे. कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट’ पाडण्यास मी आलो आहे; ३६आणि ‘मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’ ३७जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही;” ऐ. स्वत:च्याही अगोदर ख्रिस्त. लुक ९:२३-२ ब. ख्रिस्तासाठी सहन करण्याची तयारी. - ख्रिस्ताला अनुसरत असताना स्वत:चा वधस्तंभ उचलून घेणे. लुक १४:२७ “जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.” - अनीतिमान लोकांमधे नीतिमान मनुष्याचे जीवन जगणे. यामधे उपहास आणि छळ यांना तोंड द्यावे लागेल. २ तिमथी ३:१२ “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल;” - ह्यामधे आम्हाला काही आशीर्वाद गमवावे लागले तरी आम्ही आमचा वेळ आणि ताकद ही शिष्यत्वाचे सकारात्मक पुढारपण करण्यासाठी खर्ची केली पाहिजे. क. येशूला अनुसरताना सर्वकाही सोडले पाहिजे. - शिष्यत्वाकरता मोजावी लागणारी किंमत. लुक १४:२८-३३ - म्हणजे येशू हाच आमच्या जीवनाचा राजा आणि प्रभू असला पाहिजे. - ख्रिस्त आणि आमच्यापुढे असणारी त्याची इच्छा ह्याच्यापुढे काहीच असता कामा नये. शिष्यत्वासाठी किंमत मोजण्याची इच्छा ही ख्रिस्ताकडून असणे गरजेचे आहे. नसेल तर अनेकजण त्याला अनुसरणे सोडून देतील. परंतु येशूने खूप मोठ्या समुदायाला कधीच स्वत:कडे आकर्षित करुन घेतले नाही. त्याला ‘शिष्य’ हवे होते. त्यासाठी किंमत मोजणे योग्य आहे का नाही? मी यावर विश्वास ठेवतो व हे मान्य करतो. ४. शिष्यत्वाचे पारितोषिक अ. भविष्यातील आशीर्वाद - देवाचा जो क्रोध येणार आहे त्यापासून आमची सुटका. प्रेषित १७:३१ “त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे.” रोम ५:९ “तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.” - देवाबरोबर सार्वकालिक जीवनाची आनंदाने अपेक्षा करुन त्याकडे पहात राहू. ज्या मधे दु:ख वेदना आणि मरण नसेल. प्रगटी २१:१-८ 'नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; (निर्गम २५:८, लेवी२६.११,) ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वत: ‘त्याच्याबरोबर राहील.’ ‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.” तेव्हा ‘राजासनावर बसलेला’ म्हणाला, “‘पाहा, मी’ सर्व गोष्टी ‘नवीन करतो.”’ तो म्हणाला, “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.” तो मला म्हणाला, “झाले! मी अल्फा व ओमेगा, म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ‘तान्हेल्याला जीवनाच्या’ झर्याचे ‘पाणी फुकट’ देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील; ‘मी त्याचा देव होईन, आणि तो माझा पुत्र होईल.’ परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.” ' ब. वर्तमान काळातील आशीर्वाद - जग देणार नाही अशी शांती येशूने देऊ केली. आपली अस्वस्थ अंत:करणे शांत करण्यासाठी. योहान १४:२७ “मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.” - त्याची सर्व वचने आम्हाला आमच्या सर्व निराशेतून बाहेर पडून आनंदी होण्यास प्रवृत्त करतात. योहान १५:११ “माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” - जे त्याला अनुसरतात त्यांना त्याने त्याचे अतूट प्रेम बहाल केले आहे. जे सर्व भयापासून आमची सुटका करते. योहान १५:९ “जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.” १योहान ४:१८ “प्रीतीच्या ठायी भीती नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.” - त्याने आम्हाला देवाच्या कुटुंबाचे सभासद बनवले. मार्क १०:२८-३३ येशूचे शिष्य होण्यासाठी जरी मोठी किंमत द्यावी लागली तरी त्याचे पारितोषिक / आशीर्वाद त्या किंमतीपेक्षा कितीतरी जास्त आहेत. आतापर्यंत आम्ही शिष्यत्व म्हणजे काय हे समजून घेतले. त्याच प्रमाणे त्याची किंमत आणि परितोषिक काय हे देखील पहिले. मला असे वाटते की आपण येशूचे खरे शिष्य बनावे. याची सुरूवात कशी करता येईल. शिष्यत्वाचे आशीर्वाद १. बाप्तिस्म्याचा समावेश. बाप्तिस्मा का? - शिष्यत्वाचे उद्दिष्ट लक्षात घ्या. ख्रिस्तासारखे असणे - तो पापरहित आणि पवित्र होता. तरी आम्ही त्याच्यासारखे असावे. बाप्तिस्मा ही एक अशी कृती आहे जी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुद्ध करणा-या रक्तामधे आणते. ज्याकडून आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळते. प्रेषित २:३८ “पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.” प्रेषित २२:१६ “तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.” रोम ६:३,४ “किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो; ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याच प्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे.” - ही एक अशी कृती आहे ज्याद्वारे आपण ख्रिस्ताला परिधान करतो. गलती ३:२७ “कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.” २. बाप्तिस्मा म्हणजे काय? अ. ही एक अशी कृती जी आमच्यातील समर्पणाची भावना प्रगट करते. ज्यामधे आमचा येशू वरील विश्वास आणि आमच्या पापाबद्दल पश्चात्ताप यातून आम्हाला पुढे नेते. प्रेषित २:३६-३८, ८:३६-३७ १. ह्यामधे लहान मुलांच्या बाप्तिस्म्याचा समावेश नाही. २. कारण लहान मुले विश्वास ठेवणे व पश्चातापाची कृती करण्यास सक्षम नसतात. ब. समर्पणाच्या ह्या कृतीमधे स्वत:ला पाण्यात बुडवणे / पुरणे ची कृती आहे. ज्यामधे पाण्यातून वर येणे हे देवाच्या सामर्थ्याने उठून नवीन जीवन जगण्यासाठी तयार होणे असा आहे. प्रेषित ८:३८, रोम ६:३,४ कलस्सै २:१२ - या मधे पाणी शिंपडणे किंवा डोक्यावर पाणी ओतणे याचा समावेश नाही. - याचा अर्थ विसर्जन किंवा पुरणे असाही होत नाही. (ग्रीक भाषेतील शब्द ‘baptidzo’ ) याचा अर्थ असा आहे. क. बाप्तिस्म्याची कृती जेव्हा देवाच्या वचनानुसार केली जाते. तेव्हा ती विश्वासाने केलेली अशी कृती असते. ज्यामधून देवाने आमच्या जीवनात केलेले अद्भुत कार्य इतरांना दिसून येते. - आमची पापे ख्रिस्ताच्या रक्तात धुतली जातात. इफिस ५:२५-२७ “अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.” - देवाच्या आत्म्याच्याद्वारे जेव्हा आमचा नवीन जन्म होतो आणि आमचे नविनीकरण होते तेव्हा आम्ही देवासाठी जगायला लागतो. तीत ३:५,६ “तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले .त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे;” - नवीन जन्मामधे पाणी आणि पवित्र आत्मा दोन्हीचा समावेश हे. योहान ३:५ “येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.” ३.पुढील शिक्षण आणि आज्ञापालन. बाप्तिस्म्यानंतर काय याचा नीट विचार करा. मत्तय २८:२० “जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” ही गोष्ट आम्हाला पुन्हा ख-या शिष्यत्वाकडे घेऊन जाते. आम्ही शिकणारे आहोत. आम्ही निरीक्षण व कृती करणारे आहोत. येशू ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार आम्ही शिकण्यास व कृती करण्यास सुरूवात केली पाहिजे. ज्यांचा आत्मिक बाप्तिस्मा झाला आहे आणि जे शिष्यत्वाच्या तत्वानुसार चालत आहेत आणि त्याकरिता त्यांनी काही किंमत मोजली आहे असेच लोक येशूचे खरे शिष्य आहेत. तेच शिष्यत्वाच्या पारितोषिकाकडे आपली दृष्टी लावू शकतात आणि त्याच्या अभिवचनातून सांत्वन पावू शकतात. मत्तय २८:२० “........आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” तुम्ही येशूचे शिष्य बनण्याकरिता पहिले पाऊल टाकले आहे का? (विश्वास, पश्चात्ताप बाप्तिस्मा) तुमच्या जीवनात शिष्यत्वाच्या खुणा दाखवून तुम्ही येशू सारखे बनण्याचा प्रयत्न करत आहात का? सर्वसमर्थ देव आपले सहाय्य करो! दीपक कसोटे @TLEF Church